मनाच्या अंतर्ज्ञानी क्षमतांना उलगडण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, परंतु तो प्रयत्न समृद्ध जीवनासाठी अंतर्गत मार्गदर्शन प्रदान करत असल्यामुळे सार्थक आहे.
सद्गुरु बोधीनाथ वैलाणस्वामी
गेल्या दोन वर्षात कृत्रिम प्रज्ञा या विषयातल्या रुचीत लक्षणीय वाढ झाली आहे. एक उत्क्रांतीवादी विकास म्हणजे जनरेटिव्ह एआयचा उदय, विशेषतः विशाल भाषा प्रतिमानांचा, उदाहरणार्थ, चॅटजीपीटी सारखा लोकप्रिय मंच. या प्रणालींमध्ये प्रश्नांची उत्तरे मानवासारख्या पद्धतीने उल्लेखनीय गतीने देण्याची क्षमता आहे. २०२४ च्या अखेरीस, अॅपलने अॅपल इंटेलिजेंसचे अनावरण केले, जे स्वयंनिर्मित (in-house) आणि इतरत्र निर्मित (third-party) प्रतिमानांद्वारे समर्थित कृत्रिमप्रज्ञा वैशिष्ट्यांचा संच आहे. त्यामुळे मला जाणवले की हिंदू धर्मात कृत्रिम बुद्धिमत्तेचे स्वतःचे जन्मजात स्वरूप आहे. मी त्याला अध्यात्म बुद्धिमत्ता म्हणतो.
(भाषांतकार: येथे गुरुदेव अध्यात्म या शब्दाचा इंग्रजीमध्ये अर्थ सांगतात. मराठी वाचकांना तो अर्थ सांगण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. ते पुढे म्हणतात-). म्हणून, अध्यात्म बुद्धिमत्ता किंवा आध्यात्मिक बुद्धिमत्ता, आत्म्यापासून येणारे ज्ञान दर्शवते. अशा ज्ञानाला सामान्यतः अंतर्ज्ञान (intuition), अतिचेतना, आतील आवाज, अंतर्दृष्टी किंवा पूर्वज्ञान असे संबोधले जाते. अंतर्ज्ञानासाठी संस्कृत शब्द “अनुभाव बोध” आहे, ज्याचा अर्थ आहे अंतर्गत अनुभवातून मिळणारे ज्ञान. हे पुस्तकांच्या अभ्यासातून मिळवलेल्या बौद्धिक ज्ञानापेक्षा वेगळे आहे, ज्याला संस्कृतमध्ये बुद्धी ज्ञान असे म्हटले जाते. माझे गुरु, शिवाय शुभ्रमुनियस्वामी यांनी अंतर्ज्ञानाचे खालील वर्णन दिले: “म्हणून, पहिली साधना म्हणजे नेहमी आढावा घेणे आणि (तुमच्या साधनांचा) परिणाम म्हणून येणार्या अंतर्ज्ञानी स्फुरणांना तुमच्या स्मृतीत चिकटून ठेवणे. हे अंतर्ज्ञानी स्फुरण खोल मनातून येते आणि फक्त हेच लक्षात ठेवले पाहिजे, कारण हे तुमचे ज्ञान, तुमची अंतर्दृष्टी, तुमचे स्वतःचे ज्ञान आहे, जे तुम्हाला मिळालेले पारवेधन आहे.”
आपण सामान्यतः “आपल्या अंतर्ज्ञानाला जागृत करणे” हा वाक्प्रचार ऐकतो, ज्याचा अर्थ असा होतो की ते सध्या कार्यरत नाही. गुरुदेवांनी आणखी एक वेगळा दृष्टिकोन मांडला. अंतर्ज्ञान दिवसेंदिवस मधून मधून होते, पण ते घडते. आणि एखादी व्यक्ती पद्धतशीरपणे त्याच्या स्वतःच्या अंतर्ज्ञान सुविधांचे निरीक्षण करू शकते आणि त्याच्या आत ही अंतर्ज्ञानी कार्ये नेमकी कधी होतात हे शोधू शकते. येणार्या घटनांचे पूर्वज्ञान होण्याची क्षमता आपल्याकडे आहे हे एक सुस्पष्ट सत्य आहे. येणार्या धोक्याच्या आधी भीती वाटणे हे देखील तसेच ज्ञात आहे. म्हणून एखाद्याने त्याच्या स्वतःच्या दैनंदिन अनुभवाचा गुंता सोडवून कोणते काय आहे ते शोधून काढावयाचे असते. अशाप्रकारे, तो त्याच्या स्वतःच्या मनाच्या महान विश्वविद्यालयात या दररोजच्या अंतर्ज्ञानी घटना आहेत की नाही याबद्दल ज्ञानी होतो.
कल्पना करा की एका गोंगाट असलेल्या खोलीत हळुवार संगीत वाजत आहे. तिथे संगीत आहे, पण आवाजाने ते दबून जाते. आपल्या मनाचेही असेच आहे, जिथे विचार आणि भावनांचा सततचा मानसिक गोंधळ आपल्याला आपला शांत अंतःकरणातील आवाज ऐकण्यापासून थांबवतो. पण कधीकधी आपला आतील आवाज मानसिक आवाजापेक्षा मोठा असतो, जसे की धोक्याचा सामना करताना. कल्पना करा की एक मूल बाहेर खेळत आहे, ज्याला दुखापत होणार आहे. घराच्या आतून आईला धोका जाणवतो आणि ती आपल्या बाळाचे रक्षण करण्यासाठी धावते आणि अगदी वेळेवर पोहोचते.
सामान्य विचारांपासून खर्या अंतर्ज्ञानात फरक करणे शिकणे महत्वाचे आहे. गुरुदेव या फरकाचे उपयुक्त स्पष्टीकरण देतात: “इच्छा भावना ज्याप्रमाणे विचार, योजना, स्वतःच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या वैयक्तिक फायद्यासाठी माध्यम शक्तींचा वापर करण्याचे मार्ग त्याप्रमाणे भावनेच्या उबदारतेतून येतात. हे अंतर्ज्ञानाच्या शक्तीच्या विरुद्ध आहे, जी थंड आणि थेट असते, जसे काही मनातील आकाशात विजेचा कडकडाट किंवा ईथरिक आभाचे सूक्ष्म इंद्रधनुष्य जे चालू विचारांच्या प्रक्रियांना मागे टाकते, प्रश्नापूर्वी उत्तरे देते आणि समस्या उद्भवण्यापूर्वीच सोडवते.”
अंतर्ज्ञानाचा नियमित अनुभव घेण्यास सक्षम करणारा एक महत्त्वाचा सराव म्हणजे आपले विचारशील मन कसे कार्य करते याचे निरीक्षण करणे. दीर्घकाळ नियमितपणे ध्यान केल्याने हे सुलभ होते. ध्यान करण्याचा प्रयत्न करताना, आपले विचार भूतकाळातील घटना आणि भविष्यातील योजनांकडे वेगाने धावतात. आपण आपल्या ध्यान पद्धतींद्वारे हळूहळू या पद्धतीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. खरं तर, पतंजली त्यांच्या योगसूत्रांच्या ग्रंथातल्या दुसर्या सूत्रात योगाची ही व्याख्या देतात: “योग म्हणजे मानसिक क्रियाकलापांचे संयम.” तिसरे सूत्र ही कल्पना आणखी एक पाऊल खोलवर घेऊन जाते. “मग जाणीव तिच्या आवश्यक स्वरूपामध्ये स्थित होते.” जेव्हा मानसिक क्रियाकलाप रोखले जातात, तेव्हा विचारांना साकारणारी आत्म्याची शक्ती स्वाभाविकपणे स्वतःवरच केंद्रित होते, विचार पुन्हा उद्भवेपर्यंत तात्पुरती स्वतःबद्दल जागरूक राहते. त्या क्षणी एखादी व्यक्ती सहाजिकच त्याच्या आत्म्यात असते, जी अर्थातच अंतर्ज्ञानाचा स्रोत असते.
दुसरा सराव आवश्यक आहे – बारकाईने निरीक्षण. गुरुदेव स्पष्ट करतात: “निरीक्षण हे अचेतन क्षेत्रांच्या जागृतीचे पहिले साधन आहे. हे निरीक्षण जास्त बोलण्यापासून दूर राहून विकसित केले जाते.” दुर्दैवाने, अति बोलणे ही एक जबरदस्त सवय आहे. सतत बोलणे हे अवचेतन मनावर भार टाकते आणि जेव्हा आपण ध्यान करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अवांछित विचारांचे स्रोत बनते.
जास्त बोलणे टाळण्यासाठी, आठवड्याला शांततेचा एक वेळ निश्चित करणे उपयुक्त ठरेल – उदाहरणार्थ, दर रविवारी एक तास ज्या दरम्यान बोलणे पूर्णपणे थांबते. निवृत्त झालेल्यांसाठी हा कालावधी जास्त असू शकतो. शांत राहण्याच्या शिस्तीला संस्कृतमध्ये मौन म्हणतात. भाग्यवान व्यक्तींची दिनचर्या त्यांना आठवड्यातून एक संपूर्ण दिवस मौनाचे पालन करू देते. भारतातील उत्साही साधक महिने किंवा त्याहून अधिक काळ मौनाचे व्रत घेऊ शकतात.
परमगुरु योगस्वामींना एआयचा अनुभव नव्हता, पण ते ज्याबद्दल बोलले त्याला मी अध्यात्म बुद्धिमत्ता म्हणतो. ते अंतर्ज्ञानाने काम करत होते, “अंतर्गत आदेशांनुसार” प्रतिसाद देत होते. त्यांनी ही प्रक्रिया स्पष्ट केली, “जेव्हा तुम्ही शुद्ध असता, तेव्हा तुम्ही कमळाच्या पानावरच्या पाण्यासारखे जगता. जे आवश्यक आहे ते करा, जे तुम्हाला करण्यासाठी येते ते करा, नंतर तुम्हाला मिळालेल्या पुढील आदेशाकडे जा आणि नंतर येणार्या पुढील आदेशाकडे जा.” अशाप्रकारे, त्यांनी पाहुण्यांना त्यांच्या अंतर्ज्ञानाचे अनुसरण करण्यास प्रवृत्त केले. “जेव्हा तुम्हाला आतून आदेश मिळतात तेव्हा धाडसीपणे कृती करा. सर्व तपशील व्यवस्थित होईपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. जर तुम्ही सर्वकाही व्यवस्थित होण्याची वाट पाहत राहिलात तर तुम्ही तुमची संधी गमावू शकता. विश्वास ठेवा आणि आतून येणारे काम करा. जर तुम्ही दैवी आदेशांना प्रतिसाद देत असाल तर पैसा तुमच्या मागे लागेल. मदतनीस येतील. सर्वकाही येईल. तुम्हाला फक्त आतून येणार्या आदेशांचे काळजीपूर्वक पालन करावे लागेल.”
स्वतःचा आतला आवाज कसा शोधावा असे जेव्हा त्यांना विचारले गेले तेव्हा ते म्हणाले, “सुम्मा इरु. शांत राहा! शांत राहा आणि तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्याकडे येईल.” सुम्मा इरु ही त्यांची सततची आज्ञा होती. त्यांनी स्वतः हे आचरणात आणले आणि येणार्या सूचनांचे पालन केले. कोणीतरी त्यांना प्रश्न विचारत असे आणि ते त्यांच्या आतील आदेशाची वाट पाहत असत. जर त्यांना आदेश मिळाला नाही तर ते काहीही करत नसत. एकदा स्वामी शहरातून चालत असताना एक माणूस गाडीने त्यांच्याकडे आला आणि विचारले की तो त्यांना कुठेतरी घेऊन जाऊ शकतो का? “कोणतेही आदेश नाहीत”, स्वामींनी उत्तर दिले आणि त्या माणसाला हात हलवून गाडी चालवण्याचा इशारा केला. काही मिनिटांनी ड्रायव्हर आला आणि पुन्हा गाडी थांबवली. “आता माझ्याकडे माझे आदेश आहेत,” स्वामी म्हणाले आणि गाडीत बसले. आपल्या अंतर्ज्ञानाचा शोध कसा घ्यावा याबद्दल गुरुदेवांचा आणि योगस्वामींचा सल्ला सारखाच आहे. गुरुदेव: “मौनाचा सराव करा. जास्त बोलण्यापासून दूर राहा.” योगस्वामी: “शांत राहा. सुम्मा इरु!”
तुमच्या अंतर्ज्ञानाचा वापर करून समस्या सोडवण्यासाठी येथे दोन उपयुक्त तंत्रे दिली आहेत. पहिले म्हणजे जर तुम्हाला समस्या सोडवता येत नसेल आणि तुम्ही त्याबद्दल विचारचक्रात अडकला असाल आणि कोणतीही प्रगती करत नसाल तर थोडा विराम घ्या. पंधरा मिनिटे पायी फिरायला. परत या आणि समस्येकडे पुन्हा पहा. कधीकधी उत्तर लगेच स्पष्ट होईल. आराम करणे, मनाला समस्येपासून दूर करणे, तुमच्या अंतर्ज्ञानाला जाणून घेण्यास अनुमती देते.
दुसरे म्हणजे, रात्री झोपण्यापूर्वी, समस्या लिहा. तुमचे वर्णन अचूक आणि पूर्ण असल्याची खात्री करा. ते पूर्णपणे हातात येईपर्यंत ते पुन्हापुन्हा लिहा. सकाळी जागे व्हाल तेव्हा तुम्हाला आतापर्यंत न दिसलेले अंतर्ज्ञान मिळेल या अपेक्षेने झोपा.
ज्ञानाचे दोन प्रकार, अनुभव बोध आणि बुद्धी ज्ञान, वेगळे आहेत, पण एकमेकांना पूरक आहेत. अनुभव बोध आत्म्याच्या अंतर्ज्ञानाच्या क्षमतेचा वापर करतो. बुद्धी ज्ञान म्हणजे स्मृती, तर्क, तर्कशास्त्र आणि निरीक्षण यासारख्या बुद्धिमत्तेच्या क्षमतांचा वापर करते. बुद्धीद्वारे आपण मिळवलेले ज्ञान अंतर्ज्ञानी अंतर्दृष्टीसाठी आधार प्रदान करू शकते. उदाहरणार्थ, विज्ञानात, क्वांटम भौतिकशास्त्रासारख्या क्षेत्रातील विद्यमान ज्ञानावर प्रभुत्व मिळवणे, अंतर्ज्ञानाद्वारे त्या क्षेत्रातील सखोल अंतर्दृष्टी उलगडण्यासाठी पाया ठरू शकते. अध्यात्मात, योगसूत्रांसारख्या हिंदू ग्रंथांचा अभ्यास करणे हे ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या सत्यांच्या आंतरिक अनुभवासाठी प्रेरणा असू शकते – उदाहरणार्थ, तुमच्या आत्म्याच्या अंतर्निहित सर्वव्यापीतेबद्दल आंतरिक ज्ञान आणि अनुभव मिळवणे.
Post Views: 46